केज : अज्ञात वाहनाने दुचाकीस्वराला जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीस्वार झाला. ही घटना केज – धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारातील विठ्ठल वस्तीजवळ बुधवारी (दि. १५ ऑक्टो) रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
कोल्हेवाडी (ता. केज) येथील संतोष शिवाजी मिसाळ (वय ३५) हे ऊसतोड मजूर म्हणून काम करीत होते. ते काही दिवसाने साखर कारखान्यावर स्थलांतरित होणार असल्याने ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी केज शहरातील गॅरेजवर लावला होता. ट्रॅक्टरच्या दुरुस्तीचे काम झाले की नाही हे पाहण्यासाठी संतोष मिसाळ हे बुधवारी रात्री गावाकडून दुचाकीवर केजकडे येत होते. त्यांची दुचाकी ही केज – धारूर रस्त्यावरील तांबवा शिवारातील विठ्ठल वस्तीजवळ आली असता भरधाव वेगात जाणार्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात गंभीर जखमी होऊन संतोष मिसाळ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. दरम्यान, संतोष मिसाळ हे शेतमजुरी व ऊसतोडणी करून कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होते. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने हे कुटुंब उघड्यावर पडले असून या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई वडील, भाऊ असा परिवार आहे.