बीड : गोपाळ समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील एकता दृढ करण्याच्या उद्देशाने गोपाळ समाज एकत्रिकरण बैठकीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी, सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत, संस्कृती लॉन्स निमगाव बायपास शिर्डी येथे होणार असून भविष्यात राज्यस्तरीय मेळावा मढी (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे पार पडणार आहे. त्या अनुषंगाने या बैठकीचा एक भाग म्हणून संस्कृती लॉन्स, निमगाव बायपास, शिर्डी येथेही विशेष सामाजिक जागृती बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक, रोजगार निर्मिती, आरक्षण, तसेच पारंपरिक रूढी व परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा व मंथन होणार आहे. याशिवाय समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती आणि त्याचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे मार्गदर्शन तज्ञांकडून दिले जाणार आहे.
बैठकीत समाजातील विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि स्वावलंबी व्हावी या दृष्टीने ठोस धोरण ठरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती, व्यवसायवृद्धी, उद्योग स्थापनासाठी शासकीय योजनांचा लाभ, तसेच समाजातील युवकांना दिशा देण्यासाठी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
गोपाळ समाज हा परंपरेने मेहनती, कष्टाळू आणि संस्कृतीप्रधान समाज असून, त्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीकडे अभिमानाने जावा यासाठी या बैठकीचे विशेष महत्त्व आहे. समाजातील महिलांच्या सक्षमीकरणावर आणि युवकांच्या नेतृत्वगुणांच्या विकासावरही विशेष भर देण्यात येणार आहे.
या एकत्रिकरणातून समाजात जागृती, एकात्मता आणि प्रगतीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तसेच आपला समाज, आपली ओळख आणि आपली जबाबदारी या भावनेने प्रत्येक समाजबांधवांनी या बैठकीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक:अखंड गोपाळ समाज यांच्याकडून करण्यात आले आहे.