बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. यानंतर ओबीसी आरक्षण संपल्याच्या विचाराने मानसिक तणावात असलेल्या एका ऑटोचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील टोकवाडी येथे उघडकीस आली आहे. आत्माराम गणपत भांगे (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्यांनी आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आयुष्य संपवले.
आत्माराम भांगे हे व्यावसायिक ऑटोचालक होते. त्यांना दोन मुले आदित्य व आदर्श असून दोघांनीही शिक्षण पूर्ण करून पोलीस भरतीसाठी मेहनत सुरू केली होती. मात्र, काही दिवसांपासून ओबीसी आरक्षण संपल्याच्या विचाराने ते तणावात होते. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, भांगे हे घरात शांत व गप्प राहू लागले होते. सतत आता मुलांना आरक्षण नाही, नोकरी लागणार नाही, या विचारात ते अस्वस्थ होते.
पत्नी व मुलगा शेतात गेले असताना आत्माराम भांगे हे घरात एकटेच होते. यावेळी त्यांनी साडीने गळफास घेत आत्महत्या केली. शेतातून परतलेल्या कुटुंबीयांना ही धक्कादायक बाब लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात आत्माराम भांगे यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात ओबीसी आरक्षण संपल्यामुळे मी आत्महत्या करत आहे, असे लिहिलेले आढळले अजे. या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण टोकवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.