जालना : जालन्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची चार चाकी स्कॉर्पिओ गाडी एका अज्ञात व्यक्तीने पेटवली. जालना शहरातल्या नीलम नगर भागात रात्री ही घटना घडली. एका अज्ञात व्यक्तीने कारला आग लावल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ज्या ठिकाणी नवनाथ वाघमारे यांची गाडी कॉलनीत उभी होती त्या ठिकाणी एक अज्ञात व्यक्ती हातामध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन आला आणि गाडीवर टाकलेल्या कव्हर वर पहिल्यांदा त्याने कॅन मध्ये असलेले पूर्ण ज्वलनशील पदार्थ चारही बाजूंनी टाकले. त्यानंतर ही आग लावून दिली. या आगीने भडका घेताच गाडीवर टाकलेले कव्हर क्षणातच जळून खाक झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस सीसीटीव्ही च्या आधारे तपास करत आहेत.
या घटनेमध्ये गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गाडीला आग लागल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहताच त्यांनी आरडाओरड केला. तसेच गाडीवर पाणी टाकून आग आटोक्यात आणली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली.
यामध्ये एक अज्ञात व्यक्ती दिसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नवनाथ वाघमारे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. ’माझी गाडी जाळली हा जरांगे समर्थकांचा कट असून यापुढे जरांगे यांच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका. गाडी जाळल्याप्रकरणी मनोज जरांगे, शरद पवार, रोहित पवार, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.