सरस्वती, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा संपर्क तुटला
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्याला बसला असून सलग दोन दिवस पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावांचा संपर्क तुटलाय, तर शेतीसह जनजीवन विस्कळीत झालं आहे. बीड जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले आहे.
आष्टी तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून परिसरातील सुलेमान देवळा, दौलावडगावसह तब्बल ३० गावांचा संपर्क तुटलाय. नदी-नाले धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागले आहेत. बीड-अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने तहसील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदी सलग दुसर्या दिवशी पूरग्रस्त झाली असून लेंडी नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. काल रात्री झालेल्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याचे चित्र दिसले. गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले आहे, तर साळेगाव कोठाळा येथे वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकर्यांना अंधारात रात्र काढावी लागली. पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील नद्या रात्रभर झालेल्या पावसानंतर विक्राळ रूप धारण करून पात्र सोडून वाहू लागल्या. नदी-नाल्यांमुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काढणीला आलेली पिके पाण्यात गेल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसलाय.
धारूर तालुक्यातही पावसाने जोरदार बॅटिंग केली. धारूर, हिंगणी, कांदेवाडी आणि देवदहिफळ परिसरात नदी-नाले भरून वाहत असून नदीलगतच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालं असून सरस्वती नदीला आलेल्या पुरामुळे गावांमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेवराई तालुक्यात गोदावरी नदी क्षेत्रात सलग दुसर्या दिवशी पूरस्थिती निर्माण झाली. तब्बल ३२ गावांना पुराचा वेढा बसला असून राक्षसभवन येथील शनी मंदिर आणि पांचाळेश्वर मंदिरासह अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. नाथसागरातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गोदावरी नदीची पातळी अधिक वाढली आहे. परिसरातील उपनद्या खळखळून वाहत असून नदीचे पाणी शेतात शिरल्याने कापूस, सोयाबीन, तूर यांसारखी खरिपाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. गोदाकाठचा परिसर अक्षरशः तळ्यासारखा दिसत आहे.