बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात येत आहेत. अपहरण, हत्या, लैंगिक अत्याचार, गावठी शस्त्रांचा वापर आणि किरकोळ कारणावरून होणार्या मारहाणींच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीडमधील गुन्हेगारीचं मूळ अधिक खोलवर गेलेलं असून, बीड शहरातील गोरे वस्ती परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
नागनाथ नन्नवरे या व्यक्तीस दहा ते बारा जणांच्या टोळक्याने लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करत अपहरण केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण थरारक घटना मोबाईल कॅमेर्यात कैद झाली असून परिसरात ती व्हिडीओ क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागनाथ नन्नवरे यांना दहा ते बारा जणांच्या टोळक्याकडून लाठ्या-काठ्यांनी अमानुष मारहाण करण्यात आली. नागनाथ नन्नवरे यांना मारहाण केल्यानंतर संबंधित टोळक्याने त्यांचे एका चारचाकी वाहनात अपहरण केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर नन्नवरे यांच्या पत्नी दिया नन्नवरे यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तीन व्यक्तींसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अद्याप या घटनेमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्राथमिक चौकशीत दिया नन्नवरे यांच्या पहिल्या पतीचा या हल्ल्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे गोरे वस्ती परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनासमोर संबंधित आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. पोलीस प्रशासनाला या टोळक्याला जेरबंद करण्यात यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.