बीड : तालुक्यातील चर्हाटा येथे जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींवर लोखंडी पाईप व रॉडने बेदम मारहाण करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील चर्हाटा या गावात एका जागेच्या वादातून मायलेकीसह तिघींवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पाईप आणि रॉडने अमानुष हल्ला केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत असून, महिलांवर होत असलेली क्रूरता पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना घराच्या जागेच्या वादातून घडली असून, शेख रिजवाना बबनीन व शेख निलफोर, शेख हरून या तिघींना गावातीलच चार ते पाच जणांनी संगनमत करून मारहाण केली. हल्लेखोरांनी महिलांना लोखंडी पाईप व रॉडने बेदम मारहाण केली. व्हिडिओत महिलांचा ओरडत बचाव मागणारा क्षण कैद झाला आहे, मात्र हल्लेखोर थांबले नाहीत. या हल्ल्यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हल्लेखोरांनी या महिलांवर केवळ जागेच्या वादातून अत्यंत अमानुषपणे हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र, संपूर्ण प्रकार पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाला अधिक सक्रिय राहण्याची गरज निर्माण झाली आहे.