नांदेड : गेल्या काही तासांपासून मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी दोन गावांमध्ये तब्बल ८० नागरिक अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने आता या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाला (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले असून लहान होड्या आणि बोटींच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु झाली आहे.
गेल्या काही तासांपासून मुखेड, उद्गीर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने मुखेड तालुक्यातील सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यासंदर्भात स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी माहिती देताना सांगितले की, मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र, तालुक्याच्या सीमेवर असणार्या उद्गीर येथील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. अलीकडेच लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पूरपरिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, रावणगाव येथील गावठाणात ८० जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे ९ जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले होते. सध्या पाऊस कमी झाला असून पाण्याची पातळी कमी झाली आहे, अशी माहिती आमदार तुषार राठोड यांनी दिली.
गेल्या तीन दिवसांपासून मुखेड तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. मात्र, रविवारी रात्री दीड-दोन वाजल्यानंतर तुफान पाऊस झाला. हा पाऊस मुखेडला कमी झाला. मात्र, तालुक्याच्या बॉर्डरवर असणार्या उद्गीर येथील धरणक्षेत्राच्या वरच्या भागात पाऊस झाला. त्यामुळे एका रात्रीत १८ फूट पाणी वाढले, असेही तुषार राठोड यांनी सांगितले.