पुणे: राज्यात पुन्हा पावसाने जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब पाऊस गायब झाला होता. आता राज्यात सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. राज्याला पुढचे ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील कोकण-गोवा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असून पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. आज आणि उद्या कोकण-गोव्यातील रायगड आणि रत्नागिरी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट विभागात मेघगर्जना आणि वादळी वार्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यात वादळी वार्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत विदर्भ आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वार्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर कोकण-गोव्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.