रेणुका कला केंद्रावर पोलिसांची धाड; गुजरातमधील 2 महिलांची सुटका
केज: केज तालुक्यातील सारूळ फाटा येथील रेणुका कला केंद्रावर लोकनाट्य तमाशाच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पुन्हा एकदा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत गुजरात राज्यातील दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, केंद्राचा मालक फरार झाला आहे. मॅनेजर आणि पार्टी मालकीणला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, मंगळवारी (दि. 5) रात्री 8 वाजता बीड अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने छापा टाकला. जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक देवीदास भागवत, उपनिरीक्षक पल्लवी जाधव, सहाय्यक उपनिरीक्षक मिरा रेडेकर आणि महिला पोलिसांसह पथकाने बनावट ग्राहक पाठवून ही कारवाई केली.
छाप्यात गुजरातमधील 32 वर्षीय आणि 30 वर्षीय दोन तरुणी आढळून आल्या. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून त्यांची सुटका केली. या प्रकरणी रेणुका कला केंद्राचा मालक रामनाथ ढाकणे, मॅनेजर शेख शफीक शेख हमीद आणि पार्टी मालकीण मिना संतोष खराडे यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालक रामनाथ ढाकणे हा सध्या फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे करत आहेत.
रेणुका कला केंद्र हे यापूर्वीही अनेक कारणांनी वादग्रस्त ठरले आहे. 2019 मध्ये येथे पोलिसांनी छापा टाकून 16 जणांना ताब्यात घेतले होते. या कला केंद्रात काम करणार्या शितल कांबळे हिचा बरड फाट्यावरील राजयोग लॉजमध्ये नेऊन खून केला होता. याप्रकरणी रामनाथ ढाकणे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. तर या कला केंद्रात नर्तकी म्हणून काम करीत असलेला तृतीय पंथी गार्गी ढलपे हिने मस्साजोग येथील अजिंक्य लॉज मध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
केज तालुक्यातील रेणुका कला केंद्रावर पुन्हा एकदा वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून महिलांची सुटका केली असून, फरार मालकाचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे रेणुका कला केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.