अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अंबाजोगाई स्वतःच्या रक्ताचं भान न ठेवता अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करणार्या बापाला अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय सत्र न्यायाधीश अजितकुमार भस्मे यांनी दिला असून, समाजमन हादरवणार्या या घटनेत न्यायालयाने स्पष्ट केले की आरोपीचं कृत्य अत्यंत अमानवी असून त्याला माफ करता येणार नाही.
पिडीत मुलगी आपल्या आई-वडीलांसह उसतोडीसाठी गेली होती. अचानक तब्येत बिघडल्याने दवाखान्यात तपासणी केली असता, ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. आई विश्वासात घेऊन विचारल्यावर मुलीने सांगितले की, तिचा स्वतःचा बाप बाळु उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड (रा. उमराई) हा गेल्या सात-आठ महिन्यांपासून दारू पिऊन, आई घरी नसताना जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार करत होता. या नराधम कृत्यामुळे ती गर्भवती राहिली.
पीडितेच्या तक्रारीवरून धारूर पोलिस ठाण्यात दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा क्रमांक २४/२०२४ अंतर्गत ालम ३७६, ३७६ (२) (एफ), ३७६ (२) (आय), ३७६ (२) (एन) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४ ( २ ), ६ अन्वये गंभीर आरोप लावण्यात आले. संपूर्ण प्रकरणाचा तपास पीएसआय प्रकाश शेळके यांनी काटेकोरपणे केला. न्यायालयात खटला चालवण्यात आला, त्यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. पीडिता, तिची आई आणि डीएनए तज्ज्ञ यांच्या साक्षी निर्णायक ठरल्या. सरकारी वकील ऍड. लक्ष्मण फड यांनी प्रकरणात ठामपणे बाजू मांडली. आरोपीने कृत्य केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात सादर केले गेले. न्यायालयाने नमूद केले की, अशा दुर्मिळ व संतापजनक घटनांमध्ये आरोपीला अधिकतम शिक्षा देणे गरजेचे आहे. त्यामुळे आरोपीस मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
या कठोर निर्णयाचे सामाजिक संस्था, महिला संघटना व वकील वर्गातून स्वागत होत आहे. सरकारी वकील ऍड. फड यांचे विशेष कौतुक करण्यात येत असून, न्याय व्यवस्थेने जनतेचा विश्वास बळकट केला असल्याचे मत व्यक्त होत आहे.