नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या देशभरातील कोट्यवधी शेतकर्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकर्यांना होती. अखेर पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये 2 ऑगस्टला शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन याबाबत घोषणा करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन 20 व्या हप्त्याबाब घोषणा करण्यात आली आहे. आता अधिक वेळ वाट पाहावी लागणार नाही. पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्ट 2025 ला वाराणसी,उत्तर प्रदेश येथील कार्यक्रमातून शेतकर्यांच्या खात्यात पाठवली जाईल. मेसेज टोन वाजताच तुमच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पोहोचली, असं समजा, अशी माहिती देण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्याकडून चालवली जाते. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 ला करण्यात आली होती. तेव्हापासून पात्र शेतकर्यांना 19 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. 19 व्या हप्त्याची रक्कम बिहारमध्ये कार्यक्रम आयोजित करुन जारी करण्यात आली होती. त्यापूर्वी 18 व्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांना महाराष्ट्रात वाशिम येथे कार्यक्रम आयोजित करुन देण्यात आली होती.
देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकर्यांना पीएम किसान सन्मान निधीची रक्कम 19 व्या हप्त्याद्वारे देण्यात आली होती. पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकर्यांना एका आर्थिक वर्षात 6000 रुपयांची मदत केली जाते. दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचा वेळ असतो. 19 व्या हप्त्याची रक्कम 24 फेब्रुवारी 2025 ला शेतकर्यांच्या खात्यात पाठवण्यात आली होती. आता 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात 2 ऑगस्टला पाठवली जाणार आहे. महाराष्ट्रातील 9325774 लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.