बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप करत मृत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे यांची आज तब्बल तासभर चर्चा झाली. मात्र, या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवत ज्ञानेश्वरी मुंडेंना ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांना तात्काळ बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे आज आंदोलनावेळी त्यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
बीडमध्ये गेल्या 18 महिन्यांपासून परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात एकही आरोपी अटक नाही. त्यामुळे यातील आरोपींना अटक करून न्याय मिळावा अशी आग्रही मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांची आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी पोलीस प्रशासनाला दिलेला अल्टिमेटम आज संपला. त्यामुळे, ज्ञानेश्वरी यांनी आपल्या नातेवाईकांसह बीडचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले होते. यावेळी, पोलीस अधीक्षकांसोबत त्यांची चर्चा देखील झाली. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
माझ्या बहिणीचा संयम सुटला आणि तिने आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड यांनी दिली. या प्रकरणात पोलीस विभागाने तात्काळ निर्णय घेण्याची गरज असून अधिवेशनात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित करावा, अशी मागणी फड यांनी केली. महादेव मुंडे खून प्रकरणात पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला हा गुन्हा वर्ग केला आहे. तसेच, आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठविण्यात येणार होते. मात्र, माझ्या बहिणीचा संयम सुटला. दरम्यान, पुढील उपचारासाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.