बीड : मध्यरात्रीच्या सुमारास अहमदनगर-पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा शिवारात भीषण अपघाताने थरकाप उडाला. भरधाव वेगातील एका चारचाकी वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. धक्कदायक बाब म्हणजे, हे वाहन आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांचे होते. अपघातावेळी सागर स्वतः वाहनात उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पारनेरच्या जातेगाव घाट फाट्याजवळ घडली. नितीन शेळके (वय ३४, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) हे दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून पारनेरच्या दिशेने येत असताना, मागून येणार्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, नितीन शेळके गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
अपघातावेळी भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर सुरेश धस (रा. आष्टी, जि. बीड) आणि सचिन दादासाहेब कोकणे (रा. तवलेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) हे दोघे वाहनात असल्याची माहिती सुपा पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर सुपा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वाहनासह सागर धस आणि सचिन कोकणे या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. सुपा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. एका लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या वाहनाने घडलेल्या या अपघातामुळे प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.