बीड : माजलगाव तालुक्याचे माजी आमदार आर.टी.देशमुख यांचे आज लातूर येथे त्यांच्या गाडीला अपघात होऊन निधन झाले. रस्त्याच्या कडेला जमा झालेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये चालक आणि अंगरक्षक हे गभंीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूर येथे उपचार करण्यात येत आहेत.
लातूर – औसा रोडवर बेलकुंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी पाच वाजेच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहिती नुसार, माजी आमदार देशमुख हे औसाकडे चारचाकी गाडीतून येत होते. बेलकुंडीजवळ उड्डाणपुलाच्या जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी उलटली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अपघात एवढा भीषण होता की गाडीचा चेंदामेंदा झाला आहे.
आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.