सिन्नर: राज्यात मान्सूनने दमदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र या पावसाचा फटका सिन्नर शहरातील बस स्थानकाला बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कृषी मंत्री आणि स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या सिन्नर बस स्थानकाचा काही भाग तुफानी पावसामुळे अचानक कोसळला.
ही दुर्घटना आता काहीवेळा पूर्वी घडली. कोसळलेला भाग बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसवर जाऊन आदळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ संपूर्ण बस स्थानक रिकामे केले असून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेमुळे सिन्नर शहरातील वाहतूक काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाली असून, नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, अवघ्या काही वर्षांपूर्वी या बस स्थानकाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले होते. त्यामुळे या घटनेमुळे बांधकाम दर्जावर आणि प्रशासनाच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बसस्थानकाच्या देखभाल दुरूस्तीचं काम देखील मंत्री कोकाटे यांच्या भावाच्या कंपनीकडे असल्याची माहिती मिळाली आहे. कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याकडे बस स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दिली होती.
या बस स्थानकाचे नियमित ऑडिट झाले होते का? बांधकामाची गुणवत्ता इतकी कमी का होती? अशा घटनांमध्ये जीवितहानी झाली असती, तर जबाबदार कोण असते? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणं अपेक्षित आहे.
या प्रकरणावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काय भूमिका घेतात, याकडे आता सिन्नरकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.