बीड : डॉक्टर दाम्पत्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे ही घटना घडली. लोखंडी रोडने डॉक्टर दांपत्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या माराहाणीमध्ये डॉक्टर दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथे डॉक्टर अमोल पवार यांच्यासह कुटुंबीयांना लोखंडी रॉडने अमानुष मारहाण करण्यात आली. अमोर पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना १० जणांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. अतिशय क्रूरपणे काही तरुण डॉक्टरला पळवून पळवून मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. १० ते १५ जणांनी मारहाण केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टर लवकर आले नाही त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी संतप्त होत हे कृत्य केले. याप्रकरणी गेवराईच्या चकलांबा पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दवाखान्यामध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांकडून डॉक्टर दाम्पत्याला मारहाण करण्यात आली. डॉक्टर अमोल पवार यांचा उमापूर येथे खासगी दवाखाना आहे. या दवाखान्यामध्ये उपचारासाठी गावातील कापसे कुटुंबीय आले होते. यावेळी डॉक्टर अमोल पवार हे लवकर न आल्यामुळे याचा राग मनात धरून मारहाण केल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. डॉक्टरांनी फिर्यादीमध्ये देखील तसे सांगितले आहे.
या मारहाणीच्या निषेधार्थ उमापूर गावामध्ये आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. आरोपींच्या शोधासाठी चकलांबा पोलिस ठाण्याचे पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. दरम्यान, बीडमध्ये दररोज गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. अमानुष मारहाण, बेदम मारहाण, हत्या, अपहरण, छळ, अत्याचार यासारख्या घटना दररोज घडताना दिसत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था नावाची गोष्ट बीडमध्ये अद्याप तरी दिसत नाही. गुंडाना पोलिसांचा धाक तरी राहिलाय का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.