नवी दिल्ली : बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमध्ये ट्रेन हायजॅक केली असून ६ पाकिस्तानी जवानांना ठार मारले आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसला हायजॅक करण्यात आलं असून ट्रेनमधील प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बलूच आर्मीकडून ६ पाकिस्तानी जवानांना ठार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. स्वंतत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्य बलुचिस्तानसाठी त्यांचा पाकिस्तानाविरुद्ध लढा आहे.
पाकिस्तानी प्रवाशांच्या ट्रेनचं अपहरण केल्यानंतर बीएलए आर्मीने गंभीर इशारा देखील दिला आहे. पाकिस्तानी सैन्याने कुठलंही पाऊल उचलल्यास किंवा कारवाई केल्यास ट्रेनमधील सर्वच प्रवाशांना ठार करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे बलूच आर्मीने अपहरण केलेल्या जाफर एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानी सैन्य, पोलीस, आतंकवादी विरोधी दल, आयएसआयचे अधिकारी प्रवास करत होते. दरम्यान, या ऑपरेशनदरम्यान बीएलए आर्मीने ट्रेनमधील महिला, लहान मुले आणि बलूच प्रवाशांना सोडून दिले आहे. बीएलएचे फियादीन युनिट, मजिद ब्रिगेड या मिशनला लीड करत आहे.