रोहितची टीम इंडिया अखेर ’चॅम्पियन्स’ ठरली
हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर १२ वर्षांचा दुष्काळ संपला आहे. धोनीच्या नेतृत्वातील टीम इंडियाने २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले होते. त्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव करत तिसर्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला आहे.
त्याआधी टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणार्या किवींनी रवींद्रच्या चौफेर टोलेबाजीमुळे १० षटकांत एक बाद ६९ अशी वेगवान सुरुवात केली होती. भारतीय फिरकीने मग किवींच्या आक्रमक बॅटिंगला ब्रेक लावला. रचिन रवींद्रने २९ चेंडूत ३७ धावांची जलद खेळी केली. केन विल्यमसन फक्त ११ धावा काढून बाद झाला, परंतु डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे न्यूझीलंडला सामन्यात परत येण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. मिशेलने ६३ धावा आणि फिलिप्सने ३४ धावा केल्या. शेवटी, मायकेल ब्रेसवेलने नाबाद ५३ धावा करत न्यूझीलंडला २५१ धावांपर्यंत पोहोचवले.
४० षटकांच्या अखेरीस न्यूझीलंडने ५ गडी गमावून १७२ धावा केल्या होत्या. येथून, पुढील १० षटकांत, न्यूझीलंडने फक्त २ विकेट गमावल्या आणि एकूण ७९ धावा केल्या. विशेषतः मायकेल ब्रेसवेलची ५३ धावांची खेळी टीम इंडियासाठी अभ्यासक्रमाबाहेरची होती. त्याने ४० चेंडूत ५३ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार मारले. एकेकाळी असे वाटत होते की न्यूझीलंड जास्तीत जास्त २३० धावा करू शकेल. पण ब्रेसवेलच्या खेळीमुळे न्यूझीलंडला २५० धावांचा टप्पा ओलांडता आला.चक्रवर्तीने सामन्यात यंग आणि ग्लेन फिलिप्सला आऊट करून २ विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवनेही २ विकेट घेतल्या. याशिवाय रवींद्र जडेजाने लॅथमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. वेगवान गोलंदाजांमध्ये शमीने १ बळी घेतला, पण शमी महागडा गोलंदाज ठरला त्याने ९ षटकात ७४ धावा दिल्या.