आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तपास करून केजच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे तपासाअंती पोलिसांनी देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला आरोपीला पहिल्या क्रमांकाचा आरोपी म्हटलंय. वाल्मिक कराडला पहिल्या क्रमांचा आरोपी ठरवताना पोलिसांनी वेगवेगळ्या पुराव्यांचा, व्हिडीओ क्लिपचा आधार घेतला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण 1400 पेक्षा जास्त पानांचं आरोपपत्र केजच्या न्यायालयात दाखल केलं आहे. आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या, खंडणी आणि अॅट्रॉसिटी अशा तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. देशमुख यांचा खून हा खंडणीतूनच झाला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आलंय.
न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण पाच गोपनीय साक्षीदार आहेत. याच साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या मदतीने वाल्मिक कराड याच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
आरोपपत्रात सांगितल्यानुससार सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती. या भेटीवेळी पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले याच्यासोबत होता. याच भेटीत विष्णू चाटे याने सुदर्शन घुले यास वाल्मिक कराडचा संदेश सांगितला होता. साक्षीदारानुसार संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, हा संदेश होता असा जबाब या साक्षीदाराने दिला आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करत असताना सीआयडीला एक महत्त्वाचा व्हिडीओ सापडला आहे. आरोपी सुदर्शन घुले संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना एक व्हिडीओ कॉल चालू होता. या व्हिडीओ कॉलची क्लिप आरोपी जयराम चाटे याने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर केला होता. हाच डिजिटल पुरावा सीआयडीने महत्त्वाचा मानला आहे. याच डिजिटल पुराव्याची मदत घेऊन संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती, असा निष्कर्ष सीआयडीने काढला आहे.