बीडमध्ये नवर्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून बळजबरीने विवाहितेला नवर्याने विष पाजलं. या घटनेत विवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महिलेचे नातेवाईक आक्रमक झालेत. महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बीड जिल्हा रुग्णालयाबाहेर महिलेच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेला बळजबरीने नवर्याने विष पाजून हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील राजपिंपरी येथे घडली आहे. कोमल नागेश पाटोळे असं मृत महिलेचे नाव आहे. ७ वर्षांपूर्वी कोमलचे लग्न झाले होते. कोमलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. ७ वर्षांपासून कोमलच्या संसाराचा गाडा अतिशय व्यवस्थित सुरू होता. पण तिच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली. कोमल आणि तिच्या नवर्यामध्ये घरगुती कारणांवरून सतत वाद होऊ लागले. याच घरगुती वादातून संतप्त झालेल्या कोमलच्या पतीने तिला जबरदस्ती विष पाजलं, असा आरोप कोमलच्या वडिलांनी केला. कोमलच्या हत्येनंतर तिचे कुटुंबीय संतप्त झाले. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. बीड जिल्हा रुग्णालयाबाहेर कोमलच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी करत आक्रोश केला. सध्या गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जोपर्यंत आरोपीला अटक केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.