बीड : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनी कठोर पावले उचलली आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ८० जणांना शुक्रवारी पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल झाल्यास एमपीडीए, मकोका अथवा हद्दपारीसारखी कारवाई करण्याची तंबी यावेळी पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनी यांनी दिला आहे.
जिल्ह्यात वारंवार उद्भवणार्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस दल अलर्ट मोडवर आले आहे. आठ दिवसांपूर्वी पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यात अवैध वाळू उपशा संदर्भात गुन्ह दाखल असलेल्या ५१ जणांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अवैध वाळू उपसा प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला होता. यानंतर शुक्रवारी राजकीय, सामाजिक व इतर गुन्हे दाखल असलेल्या ८० जणांना पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते.
या सर्वांना प्रारंभी अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर यांनी सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी पोलिस दल कठोर पावले उचलत असून यापुढे तुमच्यावर गुन्हा दाखल झाल्यास यापुर्वीच्या गुन्ह्यांच्या आधारावर मकोका, एमपीडीए तसेच हद्दपारीसारखी कठोर कारवाई केली जाईल असा इशारा या ८० जणांना देण्यात आला. यानंतर स्वतः पोलिस अधिक्षक नवनित कावत यांनीही या ८० जणांना अशाच पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा भरात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले हे सर्वजण होते. आता पोलिस अधिक्षकांनी थेट अशा पद्धतीने कारवाईचा इशारा दिल्याने या ८० जणांसह इतर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंडळींमध्येही जरब निर्माण होत जिल्ह्यात शांतता नांदेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.