केज : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केलं. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी मारण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला होता. मात्र मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केलेल्या विनंतीनंतर धनंजय देशमुख यांनी टाकीवरून खाली उतरण्याची तयारी दर्शवली आहे.
धनंजय देशमुख टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचे समजताच मनोज जरांगे पाटील हे जालन्यावरून मस्साजोगकडे रवाना झाले होते. मात्र तिथं पोहोचण्याआधीच देशमुख हे पोलिसांना चकवा देऊन आपल्या दोन नातेवाईकांसह पाण्याच्या टाकीवर गेले. तसंच त्यांनी टाकीवर जाताच शिडीही काढून फेकल्याने पोलिसांना वर जाता येत नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र देशमुख हे आपल्या आंदोलनावर ठाम होते.
देशमुख यांना विनवणी करताना मनोज जरांगेंच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. त्यानंतर काही वेळाने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हेदेखील तिथं पोहोचले. तुमच्या मागण्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे. मी स्वत: याबाबत सीआयडी आणि एसआयटीच्या प्रमुखांशी बोलतो, असा शब्द काँवत यांनी दिला.
दरम्यान, मनोज जरांगे आणि नवनीत काँवत यांच्याकडून वारंवार करण्यात आलेल्या विनंतीनंतर अखेर दोन तासांनी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले.
काय आहेत धनंजय देशमुख यांच्या मागण्या?
हत्या आणि खंडणी प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याने वाल्मीक कराडवर मकोका लावून, सरपंच हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करा, मोकाट कृष्णा आंधळेला अटक करावी, शासकीय वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी, एसआयटीत पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्त्ती करा, तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना द्या, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सहआरोपी करा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.