मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासाला गती यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद हे आता बीडला जाणार आहेत. संसदेचे हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबरला संपत आहे. हे अधिवेशन संपताच दुसर्याच दिवशी शरद पवार हे बीडच्या दौर्यावर जाणार आहेत.
शरद पवार हे मस्साजोग गावात जाऊन मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. कालच आमदार रोहित पवार यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची विचारपूस केली होती. 10 दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. शरद पवार सांत्वनपर भेटीसाठी देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणार आहेत. आता शरद पवार मस्साजोग गावात येऊन पोलीस तपास आणि अन्य परिस्थितीचा आढावा घेतील.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांचा मृतदेह केज परिसरात आढळून आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनं सरपंच आणि त्यांचा भाऊ धारूरहून केजच्या दिशेने जात असताना अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून सरपंचांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे अपहरण करण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर सरपंच संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. संतोष देशमुख यांना अमानुष पद्धतीने मारहाण आणि छळ करुन मारण्यात आले होते. अंगावर मारहाणीचे वळ असलेले त्यांच्या मृतदेहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत विष्णू चाटे याच्यासह तीन जणांना अटक केली आहे.
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांचा सहभाग होत असल्याचा आरोप होत आहे. संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याचे वाल्मिक कराड यांच्याशी जवळचे संबंध होते. विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. तसेच तो अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केज तालुकाध्यक्ष होता. मात्र, आरोपांची राळ उठल्यानंतर विष्णू चाटे याला पदावरुन दूर करण्यात आले आहे.