गेवराई : शेतातून स्कुटीवरून गेवराई शहराकडे जात असताना पाठीमागून येणार्या भरधाव ट्रकने स्कुटीला धडक दिली. या अपघातात किराणा व्यापा-याचा जागीच मृत्यू झाला. रमेश चत्रभुज बंग (वय 59, रा. गेवराई, जि.बीड) असे मृत व्यापा-याचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री बीड- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गेवराई शहराजवळील एका पेट्रोल पंपाजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत रमेश बंग रविवारी बेलगाव शिवारातील पिकांची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यानंतर सायंकाळी बंग आणि गोपाल भुतडा स्कुटीवरून बेलगावहून गेवराईकडे जात होते. यावेळी भरधाव ट्रकने त्यांच्या स्कुटीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात बंग ट्रकच्या टायरखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गोपाल भुतडा जखमी झाले. बंग यांचा मृतदेह रात्री उशिरा गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. आज त्यांच्या पार्थिवावर गेवराईत अंत्यसंस्कार करण्यात आले.