परभणी : शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाची प्रतिकृती एका इसमाने जागेवरून काढून तिचा अवमान केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली. या प्रकारानंतर सदरील कृत्य करणार्या इसमास परिसरातील नागरिक, युवक, जमावाने चोप दिला. यानंतर घटनास्थळी जमावाने रास्ता रोको करून निषेध व्यक्त केला. यामुळे शहरात सायंकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामार्गाजवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. पुतळ्याचे मागील काही महिन्यापूर्वी सुशोभीकरण केले होते. पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर भारतीय संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. ही संविधानाची प्रतिकृती मंगळवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एका इसमाने जागेवरून काढली. ही बाब माहीत होताच संबंधित इसमाला परिसरातील जमाव, युवक, नागरिक यांनी चोप दिला. घटनास्थळी नवा मोंढा आणि पोलिस यंत्रणेतील विविध पथके दाखल झाली. त्यानंतर संबंधित इसमास जमावाच्या ताब्यातून घेत पोलिसांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकारानंतर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात शेकडो युवक, आंबेडकर प्रेमी नागरिक यांच्यासह जमाव जमला होता. या सर्व जमावाने महामार्गावर पुतळ्यासमोर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, नवा मोंढ्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.आर.बंदखडके यांच्यासह आरसीपी प्लाटून आणि विविध पोलीस पथके दाखल झाली होती. पोलीस अधिकार्यांकडून संबंधित प्रकारामध्ये जमावाला आणि आंबेडकर प्रेमी जनतेला शांततेचे आवाहन करण्यात आले. संबंधित इसमाला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी करीत रस्त्यावर ठिय्या मांडला होता. या घटनेने शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील बाजारपेठ बंद
परभणी शहरातील घटनेनंतर संपूर्ण शहरातील विविध भागातील बाजारपेठ काही वेळातच बंद झाली. विविध ठिकाणी या घटनेची माहिती समाज माध्यमाद्वारे समोर आल्यानंतर सगळीकडे तणाव निर्माण झाला. मुख्य महामार्गावर पुतळ्यासमोर केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे उड्डाणपूल, बसस्थानक, रेल्वेस्टेशन, स्टेशन रोड, वसमत महामार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर अशा सर्व भागातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.