केज : केज-कळंब रोडवर माळेगाव नजीक कार ने दुचाकीला समोरून धडक दिली या अपघातात दुचाकीवरील तरुण व महिला जखमी झाले होते.मात्र उपचारादरम्यान २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. सदर घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजता घडली.
माळेगाव येथील रहिवासी अशोक मारुती चिरके (वय २५) व वनिता धर्मराज गायकवाड वय ५० (रा सुकळी)हे दोघे एमएच ०५ एई ११९२ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातील कामे उरकून घराकडे जात होते. त्याच वेळी केजहुन एमएच २३ बिसी ६३८३ ही भारत सरकार लिहिलेली कार कळंबकडे जात होती. माळेगाव नजीक कार चे नियंत्रण सुटून उजव्या बाजूने चालणार्या दुचाकी ला समोरून जोराची धडक दिली. यात दुचाकी वीस फूट फरफटत गेली. त्यामुळे अशोक चिरके याच्या कमरेला आणि पायाला गंभीर दुखापत झाली तर मागे बसलेल्या वनिता गायकवाड या देखील जखमी झाल्या. अपघात घडल्यानंतर कार रस्त्याच्या बाजूला पंधरा फूट खड्ड्यात जाऊन पडली. अपघातावेळी कार मधील एअर बॅग उघडल्याने दोन महिला, दोन पुरुष आणि लहान मुलगा यांना सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही.
अपघातानंतर गावातील तरुणांनी जखमींना अंबाजोगाई च्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले. मात्र अशोक चिरके या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अपघातात दुचाकी व कारचे मोठे नुकसान झाले आहे.सदर कार वर भारत सरकार लिहिलेले दिसून येत असल्याने सदर गाडी नेमकी कुणाची आहे ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.