भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, नितेश राणेंना संधी
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात केवळ १८ जणांनाच संधी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी येत्या दि. १३ अथवा १४ डिसेंबर रोजी हा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी सहा मंत्र्यांचा समावेश होणार आहे.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मूल्यमापन करूनच मंत्रिपदे दिली जाणार असल्याचे सूतोवाच माध्यमांशी बोलताना केले होते. त्यामुळे इच्छुकांनी साखरपेरणीला सुरुवात केली आहे; तर धाबे दणाणलेल्या ज्येष्ठांनी मनधरणीला सुरुवात केली आहे. आपापल्या पक्षात नेत्यांकडे मंत्रिपदांसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. आधीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचे जे मंत्री होते, त्यांच्या कामाचे मूल्यमापन करूनच त्यांना पुन्हा मंत्रिपद द्यायचे अथवा नाही याचा निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे भाजपबरोबरच शिवसेना आणि राष्ट्रवादीसाठीही हाच निकष लागू असणार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांतील इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. विभागीय संतुलनाचेही सूतोवाच फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोठी कसरत करावी लागण्याची चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गटानेही तसेच संकेत दिले आहेत.
दरम्यान, पहिल्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात प्रत्येक पक्षाकडून सहा-सहाजणांनाच संधी मिळणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यातील विस्तार हा १८ जणांचाच असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्प्यातील विस्तारात उर्वरित नेत्यांचा विचार होऊ शकतो. दरम्यान, भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले जाण्याची शक्यता आहे. दोन चेहरे नवे असण्याची शक्यता असून नितेश राणे यांचे नाव आघाडीवर आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फार धक्कातंत्राचा वापर होणार नसल्याचे सांगितले जात आहे. प्रकृतीच्या कारणास्तव दिलीप वळसे-पाटील यांच्या जागी इतर नेत्याला संधी मिळू शकते; तर छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
केसरकर, सत्तार, सावंत यांच्यावर टांगती तलवार
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो. तानाजी सावंत, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे; तर उदय सामंत, शंभूराज देसाई यांची नावे नक्की मानली जात आहेत. संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांचा समावेश होऊ शकतो. मात्र त्यांना राज्य मंत्रिपदावर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे.