जिल्ह्यात पहिला निकाल परळीचा तर शेवटचा आष्टीचा
लागणार, दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान सहाही मतदार संघातील निकालाचे चित्र होणार स्पष्ट, जिल्ह्यात शांतता ठेवण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
बीड -जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे, पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे जिल्ह्यात शांतता ठेवावी, असे आवाहन श्री. पाठक यांनी केले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडली. बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पाच ते सहा ठिकाणी अप्रिय घटना घडल्या. त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपासून सुरु होईल. प्रत्येक ठिकाणी 14 टेबल वर ही प्रक्रिया सुरु होईल. सुरवातीला टपाली मतमोजणी होईल, ही प्रक्रिया समांतर पद्धतीने पार पडेल, त्यानंतर इव्हीम मशीन वरील मतमोजणी सुरु होईल.बीडमध्ये 29, माजलगाव 28 आणि गेवराई या ठिकाणी 29 फेर्या होतील. तर आष्टी मध्ये सर्वाधिक 32 फेर्या होतील. केज 30 तर परळी या ठिकाणी 26 फेर्या होतील. सर्वात पहिला निकाल हा परळीचा अपेक्षित असून शेवटचा निकाल आष्टीचा लागेल. मतमोजणी प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशी माहिती पाठक यांनी दिली.