राजू पवार | नांदेड
कंधार तालुक्यातील मौजे जाकापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदार जनजागृती निमित्ताने गावातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात येऊन मतदान जनजागृती करण्यात आली. येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा आणि लोकसभेचे मतदान होणार आहे. मतदान हा एक राष्ट्रीय उत्सव आहे.यात प्रत्येकाने सहभागी होऊन निर्भय आणि निप:क्षपातीतपणे मतदान केले पाहिजे असे आवाहन करण्यात आले.
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढविल्यास लोकशाही अधिक बळकट होणार आहे. मतदान हे आपल्याला संविधानाने दिलेला हक्क आहे. मतदान जनजागृती केल्यामुळे लोकांना मतदानाचे महत्त्व समजत असते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाकापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरी, चौथी आणि पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांनी स्वीप च्या माध्यमातून गावातून भव्य रॅली प्रभात फेरी काढण्यात येऊन; मतदानाचे महत्त्व लोकांना पटवून दिले. यावेळी मतदानाचे महत्त्व सांगणार्या घोषणा देण्यात आल्या. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मतदार जनजागृती रॅली काढून स्तुत्य उपक्रम राबविल्यामुळे त्यांचे जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे. या मतदान रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री सी. आर. चाटे,श्री डी.बी.साळुंके सर, श्री डी.बी. जगताप सर पोलीस पाटील बालाजी कापसे, अंगद पवार यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.