आ.पंकजाताई मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी राहणार उपस्थित
कोणतेही शक्ती प्रदर्शन, रॅली किंवा सभेचे नसणार आयोजन!
परळी : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी परळीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत साध्या पद्धतीने भरणार आहेत.
उमेदवारी अर्ज सादर करताना भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्यासह परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना व घटकपक्ष महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.
दरम्यान नेहमी रेकॉर्डब्रेक गर्दी व विक्रमी सभांचे आयोजन करणारे धनंजय मुंडे हे यावेळी साध्या पद्धतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून कोणतेही शक्ती प्रदर्शन रॅली किंवा सभेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे त्यांच्या कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
२०१९ च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मागील पाच वर्षाच्या काळात सामाजिक न्याय व कृषी या दोन खात्यांचे बारी बारीने मंत्री पद सांभाळले. या काळात परळी विधानसभा मतदारसंघासह बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक भरीव कामे करत धनंजय मुंडे यांनी पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कोविड महामारीच्या काळात धनंजय मुंडे यांनी परळीसह जिल्ह्यात केलेले सूक्ष्म नियोजन अत्यंत प्रभावी ठरले, त्याची दखल अगदी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा घेतली.
परळी मतदारसंघात देखील या काळात मुंडेंच्या माध्यमातून अनेक विकासकामे पूर्ण करण्यात आली, तर अनेक कामे प्रगतीपथावर आहेत, त्याचा फायदा या निवडणुकीत धनंजय मुंडे यांना निश्चितच होईल.