spot_img
2.8 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img

आज एक क्लिक अन् शेतकर्‍यांच्या खात्यात येणार ४००० रुपये

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या १८ व्या हप्त्याचे २००० रुपये आज मिळणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे २००० रुपये शेतकर्‍यांना मिळणार आहेत. देशभरातील शेतकर्‍यांना २ हजार रुपये तर महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना केंद्र आणि राज्य सरकारचे असे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये वाशिम येथे होणार्‍या कार्यक्रमात शेतकर्‍यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारनं पीएम किसान सन्मान योजना २०१९ च्या निवडणुकीपूर्वी सुरु केली होती. त्या योजनेद्वारे आतापर्यंत १७ हप्त्यांची रक्कम शेतकर्‍यांना देण्यात आली आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे शेतकर्‍यांना यापूर्वी ४ हप्त्यांची रक्कम दिली गेली आहे. आज राज्यातील शेतकर्‍यांच्या खात्यात केंद्र सरकारच्या ’पी. एम. किसान’ योजनेच्या १८ व्या हप्त्याचे आणि महाराष्ट्र राज्याच्या ’नमो शेतकरी महासन्मान’च्या पाचव्या हप्त्याची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या वितरणाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सुमारे ९१.५३ लाख लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात ’पी.एम. किसान सन्मान निधी’ व राज्याच्या ’नमो शेतकरी महासन्मान निधी’ या योजनांचे प्रत्येकी २ हजार रुपये असे एकूण ४ हजार रुपये जमा होणार आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकर्‍यांच्या खात्यात १७ हप्त्यांमध्ये ३४ हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. देशभरात या योजनेतील पात्र शेतकर्‍यांची संख्या ९ कोटी ४० लाख इतकी आहे. पीएम किसान सन्मान योजनेच्या १८ व्या हप्त्याद्वारे शेतकर्‍यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वर्ग करण्यात येईल.
पीएम किसान सन्मान योजनेच्या १८ व्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास योजनेतील पात्र शेतकर्‍यांना २००० रुपये मिळवायचे असल्यास ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे. ई केवायसी करण्यासाठी शेतकरी पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात. तिथं ई केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर फोनवर ओटीपी क्रमांक येईल तो ओटीपी क्रमांक नोंदवल्यानंतर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पीएम किसान सन्मान योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसानचं ऍप आणि नागरी सुविधा केंद्रात ई केवायसी करता येईल.

ताज्या बातम्या